नवी दिल्ली : राफेल विमानांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी पॅरीसमधील फ्रेंच विमान तळावरून संरक्षण मंत्री राजनाथसिंह मंगळवारी रोजी या विमानातून उड्डाण करतील, अशी माहिती संरक्षण खात्याच्या सुत्रांनी दिली.
राफेलच्या 36 विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबरला भारताला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी सात तारखेला राजनाथसिंह पॅरीसला रवाना होणार आहेत. हा ताफा स्वीकारल्यानंतर राजनाथसिंह या विमानातून भरारी घेतील.
या विमान ताफा हस्तांतरण सोहोळ्याला फ्रान्सचे वरीष्ठ लष्करी अधिकारी, विमानाचे निर्माते असणारी कंपनी डॅसॉल्ट एव्हिएशनचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित असतील. जुलै 2017मध्ये तत्कालीन हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी राफेल विमान उड्डाणाचा अनुभव घेतला होता.
फ्रान्स आणि भारतातील लष्करी सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने राजनाथसिंह फ्रान्सच्या वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बुधवारी (दि. नऊ) व्यापक चर्चा करतील. या सोहोळ्यासाठी भारतीय हवाई दलाचे एक पथक यापुर्वीच रवाना झाले आहे. या विमानांच्या खरेदीचा करार सप्टेंबर 2016 मध्ये झाला होता. एकूण 58 हजार कोटींचा हा व्यवहार आहे.