साउदम्पटन – जोस बटलरने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर त्यांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ऍरन फिंच, मार्कस स्टोनिक्स, ग्लेन मॅक्सवेल व ऍश्टन यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर 7 गडी गमावून 157 धावा उभारल्या. विजयासाठी 158 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी कोणतेही दडपण न घेता खेळ केला.
बटलरने 54 चेंडूत 8 चौकार व 2 षटकार फटकावताना नाबाद 77 धावांची खेळी केली. त्याला योग्य साथ देताना डेव्हिड मलान याने 42 धावांची खेळी केली. इंग्लंडने हा सामना 19 व्या षटकांतच जिंकला व मालिकेत विजयी आघाडी घेतली.
या मालिकेत अद्याप ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सूरच गवसलेला पाहायला मिळाला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच भोपळा न फोडताच बाद झाला.