डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू – उद्योगमंत्री सुभाष देसाई

‘सीआयआय हॉस्पिटल टेक -२०२०’चे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Madhuvan

मुंबई – डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने आपण कोरोनासारख्या संकटावर सहज मात करू शकतो, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वतीने (सीआयआय) आयोजित ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी देसाई बोलत होते. यावेळी ब्रिटीश उप उच्चायुक्त अँलन गेमेल, डॉ. रमाकांत देशपांडे, सुधीर मेहता, जॉय चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, राज्य शासन कोविड संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यात आली. आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठादेखील वाढविला आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांची चाचणी केली जाईल. प्रतिदिन सुमारे दीड लाख चाचण्या करण्याचा शासनाचा मानस आहे.

नुकतेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने सुरू केली आहे. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नवीन तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरते. त्याचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री देसाई म्हणाले.

दरम्यान, सीआयआयच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या टेलिआयसीयू प्रकल्पास राज्य शासन सर्व सहकार्य करेल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

चार दिवस चालणाऱ्या या डिजिटल प्रदर्शनात साठहून अधिक देशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. आरोग्यविषयक तीनशेहून अधिक उत्पादने या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. या उपक्रमास नेदरलँडने ‘भागीदार देश’ म्हणून पाठिंबा दर्शविला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.