नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणूकीत जबरदस्त धक्का बसला आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला असून एकही उमेदवार आपली अनामत रक्कम वाचवू शकला नाही. आपला भुईसपाट करीत भाजपने बंपर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत रालोआचा घटक पक्ष असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली होती.
एकूण 30 जणांना उमेदवारी जाहीर केली होती. पण प्रत्यक्षात 2३ उमेदवारच उमेदवारी अर्ज दाखल करू शकले होते. उर्वरित उमेदवारांना अर्ज भरता आला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार सभा सुध्दा घेतली होती.
मात्र, एकाही उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संपुर्ण दिल्लीतून केवळ 3 हजार 64 मतं मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ 0.03 टक्के मते मिळाली आहेत. यापेक्षा जास्त मते नोटामध्ये नोंदविण्यात आली आहेत.
एनडीएतील घटक पक्ष असलेले जनता दल युनायटेड आणि जनशक्ती पासवान पक्षाचे एक-एक उमेदवार हे पराभूत जरी झाले असले तरी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. पण अशी कामगिरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला करता आली नाही. पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर अजित पवारांनाच बाहेरचा रस्ता दाखवला गेल्याचे स्पष्ट झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्ली विधानसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी या निवडणुकीतून आम्हाला खुप शिकायला मिळाले आहे. ही सुरुवात आहे. मिळालेल्या अपयशाचे विश्लेषण करुन भविष्यात देशपातळीवर पक्षबांधणीसाठी अधिक मेहनत घेतली जाईल. दिल्लीसह इतर अन्य राज्यात पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.