#T20WorldCup | पराभवामुळे बांगलादेशच्या अडचणींत वाढ

दुबई – जायंट किलर ठरलेल्या स्कॉटलंडकडून बांगलादेशचा पराभव झाला. मात्र, हा केवळ एका सामन्यातील पराभव नसून त्यामुळे बांगलादेश संघाचे येथे सुरू असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या स्पर्धेत आपल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशला अननुभवी स्कॉटलंडने सहा धावांनी पराभूत केले. हा पराभव बांगलादेशला फार महागात पडू शकतो. या पराभवामुळे बांगलादेशवर स्पर्धेबाहेर जाण्याची स्थिती दिसू लागली आहे.

ओमानमधील अल एमिरेट्‌स मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्कॉटलंडने 20 षटकांत 9 बाद 140 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकांत 7 बाद 134 धावांवरच रोखत स्कॉटलंडने विजय मिळवला. स्कॉटलंडच्या ख्रिस ग्रीव्हजने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 45 धावा केल्या. त्याने मार्क वॅट (22) सोबत सातव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली.

बांगलादेशकडून मेहदी हसनने 3 तर शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी 2 बळी घेतले. पहिल्या फेरीतील दोन सामन्यांतच टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा यंदा चांगलीच रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

शाकिबचा विक्रम

बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याने टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतील स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात एक अनोखी कामगिरी केली आहे. त्याने टी-20 सामन्यांच्या कारकिर्दीत 108 बळी नोंदवले आहेत. त्याने श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. शाकिबच्या नावावर 89 सामन्यात 108 बळी मलिंगाने श्रीलंकेकडून 84 टी-20 सामन्यांत 107 बळी घेतले आहेत.

पहिल्याच सामन्यात नवख्या स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. पहिल्या सामन्यानंतर स्कॉटलंडची स्थिती बळकट झाली असून बांगलादेशचा संघ या पराभवामुळे पात्र होणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता सुपर 12 स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे.

बांगलादेशचा एक सामना झाला असून अजून दोन सामने बाकी आहेत. 19 ऑक्‍टोबर रोजी बांगलादेशचा सामना यजमान ओमानसोबत होणार आहे. त्यानंतर बंगलादेश पापुआ न्यू गिनीविरुद्ध (पीएनजी) गुरुवारी होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये बांगलादेशला केवळ विजय मिळवणे हेच आव्हान नसून त्यांना नेट रनरेटही जास्त वाढवावा लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड : 20 षटकांत 9 बाद 140 धावा. (ख्रिस ग्रीव्हज 45, मार्क वॅट 22, मेहदी हसन 3-19, शकिब अल हसन 2-17). बांगलादेश – 20 षटकांत 7 बाद 134 धावा. (मशफिकुर रहीम 38, महमदुल्ला 23, ब्रॅडली व्हीएल 3-24).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.