नवी दिल्ली : देशात सरकारने तयार केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याचे पडसाद भारताबाहेर देखील उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
The statue of Mahatma Gandhi at the Mahatma Gandhi Memorial Plaza in front of the Embassy was defaced by Khalistani elements on December 12, 2020: Indian Embassy in Washington DC, US https://t.co/QHGhkV8Agc
— ANI (@ANI) December 12, 2020
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशाबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र, वॉशिग्टनमध्ये कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलकांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. वॉशिग्टनमधील भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.
भारतीय दूतावासाकडून या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेचा दूतावासाकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. शांती व न्यायाचे प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असे दूतावासाने म्हटले आहे. दूतावासाने अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.