पुणे विद्यापीठाची पोलिसांत तक्रार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करून अवैधरित्या परीक्षा कशी द्यावी, याबाबत सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रसारित करून विद्यापीठास बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार पुणे विद्यापीठाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिली.
पुणे विद्यापीठामार्फत ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. सुमारे अडीच लाख विद्यार्थी पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाची परीक्षा देत आहेत. त्यातील दोन लाखांहून अधिक विद्यार्थी ऑनलाइनद्वारे परीक्षा देत आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाकडून योग्य ती काळजी घेत परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, या परीक्षांमध्ये गैरप्रकार करून अवैधरीत्या परीक्षा कशी द्यावी, याबाबत बेजबाबदार व बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची 7 मिनिट 32 सेकंदाच्या व्हिडिओद्वारे दिशाभूल करण्यात येत आहे. याद्वारे विद्यापीठ आणि विद्यापीठासाठी काम करणाऱ्या सेवा पुरवठादारांची व सर्व संबंधितांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे प्रचलित कायद्याचा भंग झाला आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून, यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी नोंदविली आहे.
24 तास हेल्पलाइन उपलब्ध करण्याची मागणी
अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणीसंदर्भात 24 तास हेल्पलाइन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली. विशेषत: ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, प्रश्न किंवा पर्याय न दिसणे, उत्तर लवकर सबमीट न होणे, वेळेत पेपर सुरू न होणे, इ-मेल व लॉगइन आयडी चुकीचा जाणे, पेपर बदलून येणे, भाषा बदलून येणे, यासारख्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर होऊ शकतो याकडे अधिसभा सदस्य संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर आणि शशिकांत तिकोटे यांनी लक्ष वेधले. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.