पुणे, दि. 15 – सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखोबा लोखंडे, पी. टी. सुशील गौतम, सिद बुकारिया, धनंजय भोसले यांच्यासह इतर काही ट्विटर आणि फेसबुक वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना सोशल मीडिया समन्वयक जयदीप पडवळ आणि आदित्य चव्हाण यांनी तक्रार दिली आहे.
आरोपींनी ट्विटर आणि फेसबुकवर छत्रपती शिवाजी महाराज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकीकास बाधा आणण्याच्या प्रयत्न केला आहे.
सोशल मीडियावर संदेश पद्धतीने प्रसारित करून बदनामी केली आहे. याप्रकरणी पुणे शहर शिवसेना मीडिया सेलचे समन्वयक आदित्य चव्हाण, माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य जयदीप पडवळ यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी तपास करीत आहेत.