पाक पंतप्रधान इम्रान खान यांना बदनामीप्रकरणी नोटीस

लाहोर – पाकिस्तानातील न्यायालयाने पंतप्रधान इम्रान खान यांना बदनामीच्या एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाज शरीफ पक्षाचे अध्यक्ष शाहबाझ शरीफ यांनी ही याचिका दाखल केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी शरीफ यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान आणि शाहबाज शरीफ यांचे थोरले बंधू यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केले गेलेले पनामा पेपर्स प्रकरण काढून घ्यावे, यासाठी शाहबाझ यांनी आपल्याला एका मित्राच्या माध्यमातून 61 दशलक्ष डॉलर देऊ केले होते, असा आरोप इम्रान खान यांनी एप्रिल 2017 मध्ये केला होता. त्यावरून शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

“पीएमएल-एन’ पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहेत. पनामा पेपर्स प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये त्यांना पंतप्रधान म्हणून अपात्र ठरवले आणि पायउतार होण्यास भाग पाडले आहे. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात ऍव्हनफिल्ड प्रॉपर्टीज, फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल अझीझिया स्टील मिल ही भ्रष्टाचाराची तीन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

इम्रान खान यांनी शाहबाझ शरीफ यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला असला तरी आपल्याला हे पैसे कोणाच्या वतीने दिले गेले याचे नाव त्यांनी घेतलेले नाही. लाहोरच्या अतिरिक्‍त सत्र न्यायालयाने शाहबाझ शरीफ यांची याचिका दाखल करून घेतली आणि 10 जून रोजीच्या सुनावणीसाठी इम्रान खान यांना नोटीस बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.