लखनौ – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर न्यायालयात हजर राहिले. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या विरोधात मानहानीची तक्रार देण्यात आली, असा जबाब त्यांनी न्यायालयात नोंदवला.
विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे अध्यक्ष असताना २०१८ यावर्षी राहुल यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर आक्षेप घेऊन भाजपचे सुलतानपूरमधील नेते विजय मिश्रा यांनी मानहानीचा खटला दाखल केला.
त्या प्रकरणी न्यायालयाने राहुल यांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, न्यायालयात हजर राहत राहुल यांनी मानहानीचा खटला दाखल करण्यासारखे कुठले वक्तव्य कुणाविरोधात केले नसल्याचे म्हटले.
त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १२ ऑगस्ट हा दिवस निश्चित केला. त्या दिवशी मिश्रा यांचा जबाब नोंदवून घेतला जाईल. संबंधित प्रकरणी राहुल याआधी २० फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहिले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत दिलासा दिला.