दौंडच्या वनक्षेत्रात हरणांची शिकार

वासुंदे, जिरेगाव परिसरातील घटना

वासुंदे – दौंड तालुक्‍यातील वासुंदे परिसरात हरणांची शिकार होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. वनक्षेत्रात लावलेल्या सापळ्यात हरीण अडकल्याने ही बाब उघड झाली असून याबाबत पाटसचे वनरक्षक पी. बी. कांबळे यांनीही दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आल्यानंतर मृत हरण दौंड येथील कार्यालयात नेण्यात आले असून शिकाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.

दौंड तालुक्‍याच्या जिरायत पट्ट्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, जिरेगाव, लाळगेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळून येतात. लांडगे, कोल्हे, घोरपड यासह विविध प्रकारच्या चिमण्या, मोर, लांडोर, पोपट यासह कित्येक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने चिंकारा जातीच्या हरणांचा मोठा समूह पाहायला मिळतो. मात्र, या वन्यजीवांची शिकार केली जात असल्याची बाब उघड झाली आहे.

सध्या, दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असल्याने अन्न, पाण्याच्या शोधात हे वन्यजीव वनक्षेत्र परिसरात भटकंती करीत आहेत. यातूनच त्यांची शिकार करण्यासह काही जण सरसावले असल्याचे उघड झाले आहे. रविवारी (दि.8) येथील गट नंबर 352 मध्ये अज्ञात शिकाऱ्याने फासे टाकून हरीण पकडण्यासाठी सापळा लावला होता. या सापळ्यामध्ये हरीण अडकून पडले नंतर हरणाने आपली सुटका करण्यासाठी हालचाल करीत सापळा घेऊन पळ काढला. परंतु, हरणाच्या पायातील सापळा झाडीत अडकल्याने तेथे कुत्र्यांच्या टोळीने हरीणाचा जीव घेतला. यातून येथे हरणांची तसेच वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, वासुंदे भागात एकाच आठवड्यात सात ते आठ मोरांचा संशयास्पद मृत्यू झाला. या मोरांना विषबाधा झाली की, अन्नपाण्यावाचून त्यांचा मृत्यू झाला, याचीही चौकशी अद्याप झालेली नाही. यासंदर्भात वनक्षेत्र अधिकारी यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वनक्षेत्रातील सदर घटनेतील मृत हरणाच्या पायाला शिकारीसाठी लावलेला फासा (सापळा) होता, त्यामुळे ही घटना शिकारीसदृश्‍य असून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
– पी. बी. कांबळे, वनरक्षक, पाटस


वासुंदे-जिरेगावच्या शिवेवर असलेल्या जाधव वस्ती परिसरात 28 ते 30 मोरांचा कळप होता. उन्हाळ्यांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून मोरांना जगविण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न केला. परंतु, वनक्षेत्रा मोरांच्या मृत्युचे कारण समजू शकले नाही.
– प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य, जिरेगाव

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)