नवी दिल्ली – तब्बल 492 वर्षांनंतर राम जन्मभूमी परिसरात पहिल्यांदा भव्य दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आगामी दीपावलीनिमित्त प्रभु श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत तब्बल 5 लाख 50 हजार लाख दिवे लावण्यात येणार आहेत. यापूर्वी फक्त मर्यादित परिसरात दिवाळी साजरी केली जात असे. शिवाय फक्त मंदिरातील पुजाऱ्यांना दिवे लावण्याची परवानगी होती.
यंदाच्या वर्षी देशात कोरोना व्हायरसंचं सावट असलं तरी अयोध्या नगरीत तब्बल 492 वर्षांनंतर दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले आहे. जवळपास तीन वर्षांनंतर हे मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
अयोध्येत दिवाळी खास पद्धतीने साजरी करण्याची तयारी सुरू आहे, याची वार्ता आजुबाजूच्या गावांतही पसरली असून, तेथील नागरिकही या दीपोत्सवात सहभागी होणार आहेत. यंदाच्या वर्षी अस्थायी मंदिरामध्ये दिव्यांचा झगमगाट करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी राम मंदिर परिसरात खरोखरेचा दिव्यांचा उत्सव पाहायला मिळणार आहे.
मात्र यावर्षी मंदिरामध्ये विशेष पूजा करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 13 नोव्हेंबर रोजी मंदिर परिसरात उपस्थित राहणार आहेत. रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, यंदाच्या वर्षी दिवाळी राम जन्मभूमी येथे साजरी करण्यात येणार आहे. ही दिवाळी अद्वितीय आणि अद्भुत असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.