मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी एनसीबी अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकातर्फे सुरु आहे. चौकशीदरम्यान एनसीबीच्या हाती ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही बॉलिवूडकर सामील असल्याबाबतचे पुरावे लागले आहेत. याच पुराव्यांच्या आधारे आता एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.
यापूर्वी, दीपिकाची मॅनेजर करिष्मा, डिझायनर सिमोन खंबाटा आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांनाही समन्स बजावण्यात आले होते. यानंतर गरज पडल्यास दीपिकालाही चौकशीसाठी बोलावण्यात येईल असं एनसीबीच्या अधिकाऱ्याने कालच सांगितले होते.
अशातच आज एनसीबीने या तिन्ही आघाडीच्या अभिनेत्र्यांना समन्स बजावले आहे. आदेशांनुसार श्रुती मोदी, सिमॉन खंबाटा आणि रकुल प्रित सिंह यांना २४ सप्टेंबरला म्हणजे उद्याच चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. दीपिका पदुकोणला २५ सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना २६ सप्टेंबरला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.