बॉक्स ऑफिसवर जेव्हा-जेव्हा दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांनी एकत्रित स्क्रीन शेअर केली, तेव्हा-तेव्हा प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले आहे. “बचना ऐ हसीनो’, “ये जवानी है दीवानी’ आणि ‘तमाशा’मध्ये ही जोडी खूपच हिट ठरली होती. आता हे दोघे पुन्हा एकदा मोठया पडद्यावर झळकणार आहेत. हा चित्रपट लव रंजन यांचा आगामी चित्रपट असणार आहे.
या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेसाठी निश्चित मानली जात असून अभिनेता अजय देवगणही काम करणार आहे. त्यानंतर आता रणबीरचेही नाव समोर आले आहे. कारण, दोन दिवसांपूर्वीच रणबीरला लव रंजन यांच्या कार्यालयाबाहेर स्पॉट करण्यात आले होते. या चित्रपटात अजय देवगण हा रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा शुभारंभ वर्षाअखेर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दीपिका सध्या कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखालील “83′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती मेघना गुलजार यांच्या “छपाक’ चित्रपटातही काम करणार आहे. दुसरीकडे रणबीर आपल्या आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीरशिवाय आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि साउथ सुपरस्टार नागार्जुन झळकणार आहेत.