मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या आपल्या आगामी “छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ऍसिड हल्ल्यातील पिडीत लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर 5 जानेवारीला दीपिका आपला 34 वा वाढदिवस साजरी करणार आहे.
यंदाच्या वर्षी दीपिकाने आपल्या वाढदिवसानिमित्त खास प्लान केले आहे. या वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणारी ग्रॅड पार्टी तिने रद्द केली असून ती आपला वाढदिवस ऍसिड हल्ल्यातील पिडितांसोबत साजरी करणार आहे. दीपिकाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका वाढदिनी लखनौ येथील शीरोज कॅफेत हजेरी लावणार आहे, जो ऍसिड हल्ल्यातील पिडीतांद्वारे चालविला जातो.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच “छपाक’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यातील दीपिकाचा लुक सर्वांनाच आवडला होता. या चित्रपटासोबतच अजय देवगणचा “तानाजी ः द अनसंग वॉरियर’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. “छपाक’नंतर दीपिकाचा “83′ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.