कंपन्यांनी जाहिराती दाखवण्याचे प्रमाण केले कमी
नवी दिल्ली : जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणला ओळखले जाते. मात्र सध्या अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्डने तिच्यापासून दूर राहणे पसंत केले आहे. अलिकडेच दीपिकाने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावली होती. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकास्त्रदेखील डागले. इतकेच नाही तर काहींनी तिच्या छपाक या चित्रपटाचाही विरोध करण्यास सुरुवात केली. तिच्याविषयी सुरु असलेल्या या वादामुळेच अनेक कंपन्या सतर्क झाल्या असून त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
ज्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दीपिका झळकली आहे. त्या कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती दाखविण्याचं प्रमाण कमी केले आहे. तसेच येत्या काळामध्ये कलाकारांसोबत कोणताही करार करताना त्यामध्ये एक नवा क्लॉज तयार करण्यात येणार आहे. सामान्यपणे कोणतीही कंपनी त्यांच्या ब्रॅण्डची गुणवत्ता स्थिर रहावी याचा विचार करत असते. त्यामुळे कोणत्याही वादाचा आपल्या कंपनीला फटका बसू नये यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते, असे कोका-कोला आणि ऍमेझॉन सारख्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितले.
एका ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीत दीपिका असल्यामुळे ही जाहिरात जवळपास 2 आठवडे दाखवू नये, असे म्हटले आहे. तसेच दीपिका जेएनयूमध्ये गेल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे. तो वाद शमल्यानंतर ही जाहिरात परत दाखवा, असे एका कंपनीने आम्हाला सांगितल्याचे एका संस्थेने म्हटले आहे. दरम्यान, ब्रिटानिया गुड्डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स,ऍक्सिस बॅकसह अन्य 23 ब्रॅण्डसाठी दीपिका जाहिरात करते. त्यामुळे दीपिकाचे नेटवर्थ 103 कोटी रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका चित्रपटासाठी 10 कोटी आणि जाहिरातींसाठी 8 कोटी रुपये मानधन आकारते.