दीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर

टोकियो – भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात पुन्हा अपयश आले. दीपिकाला टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे या स्पर्धांमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

दीपिकाला २०१२ लंडन आणि २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदा कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिच्यावर दडपण होते. तिने मागील महिन्यात तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई करतानाच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. परंतु, तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

तिरंदाजी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दीपिकाला कोरियाच्या सान आनने ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सानने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ केला. तिने पहिला सेट ३०-२७ असा जिंकला. सानने पहिल्या सेटमध्ये तिन्ही बाण अचूक १० गुणांवर मारले.

दुसऱ्या सेटमध्ये दीपिका पुनरागमन करेल अशी आशा होती. तिने पहिला बाण १० गुणांवर मारला. यानंतरच्या दोन प्रयत्नांत मात्र तिला ७-७ गुणच मिळवता आले. तर सानने एकूण २६ गुण मिळवले. त्यामुळे दीपिकाने दुसरा सेट २४-२६ असा गमावला. तिसऱ्या सेटमध्येही दीपिका चांगला खेळ करू शकली नाही. तिने हा सेटही २४-२६ असा गमावला आणि तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.