Paris Olympics 2024(Archery,Women’s Individual Quarter Final) : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी आणखी निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या नाम सू ह्यूनने पराभूत केले आहे. नाम सू-ह्यूनने दीपिका कुमारीचा ४-६ असा पराभव केला.
दीपिका कुमारीच्या पराभवानंतर पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय तिरंदाजांच्या संधी संपुष्टात आल्या आहेत. अशाप्रकारे भारताला ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीतील पहिल्या पदकासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला आतापर्यंत तिरंदाजीमध्ये पदक जिंकता आलेले नाही.
यंदा पुरुष आणि महिला यांचा पूर्ण संघ उतरून देखील पदकाचा नेम कुणालाच साधता आला नाही. धीरज आणि अंकिता यांचा मिश्र संघ आणि वैयक्तिक मध्ये दीपिका पदकाच्या जवळ जाऊन देखील लांबच राहिले.
आणि पदक अपेक्षांचे बाण हवेतच विरून गेले.
दुसरीकङे, आजच्याच दिवशी नेमबाजीत मनु भाकर कडून पदकांची हॅट्ट्रिक थोडक्यात हुकली. 25 मी पिस्तूल अंतिम फेरीत मनु चौथ्या क्रमांकावर राहिली. असं असलं तरी दोन पदकांसह मनुने पॅरिस ऑलिंपिकला निरोप दिला. ही तिची ऐतिहासिक अशी कामगिरी सदैव स्मरणात राहील.