दावोस इथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा विशेष सन्मान करण्यात आला. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या कामासाठी तिला “क्रिस्टल ऍवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
मार्टिन ल्युथर किंग डे च्या निमित्ताने दीपिकाला हा पुरस्कार देण्यात आला. आपल्या धीरगंभीर भाषणामध्ये दीपिकाने मानवी हक्कांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या जगामध्ये जे काही घडते, ते आशा असल्यामुळेच घडते. ही आशा जिवंत ठेवली पाहिजे, असे दीपिका म्हणाली.
View this post on Instagram
“द लीव्ह लव्ह लाईफ फाउंडेशन’च्या माध्यमातून दीपिकाने 2015 च्या जून महिन्यात आपल्या सामाजिक कामाला प्रारंभ केला. या स्वयंसेवी संस्थेच्य माध्यमातून तिने जगभर मानसिक आरोग्याबाबतचे सेमिनार आणि कार्यशाळांचे आयोजन केले. स्ट्रेस, ऍन्झायटी आणि डिप्रेशन सतावत असलेल्या प्रत्येकापर्यंत पोहोचून त्याला आशेचा किरण दाखवण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. दीपिकाने यापूर्वीही आपण स्वतःही नैराश्यातून गेलेले असल्याचे सांगितले आहे.
प्रेम आणि द्वेषाचे उतारचढाव असलेल्या माझ्या आयुष्यानेच मला नवसंजीवनी दिली, असे तिने सांगितले आहे. संयम दाखवून आशादायक राहण्याचा धडा या अनुभवातूनच मिळाला असल्याचेही तिने सांगितले. ऍसिड हल्ल्यातील पीडित युवतीच्या जीवनावरील “छपाक’मध्ये दीपिकाच्या रोलला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातूनही आशादायक राहण्याचाच संदेश दीपिका देते आहे.