दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; विनोद शिवकुमारवर गर्भपाताचा गुन्हा दाखल

अमरावती  – वन अधिकारी दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली यांचा गर्भपात केल्याप्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल क्षेत्रात कार्यरत आरएफओ (परिक्षेत्र अधिकारी) दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात वरीष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्यावर दीपालीने मृत्यपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप करत आत्महत्येला जबाबदार म्हटले होते.

त्यामुळे 25 मार्च रोजी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा 306 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. धारणी पोलिसांनी वेगाने तपास करत आहे. शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे शिवकुमार यांच्या गुन्ह्यांत वाढ करून 312,504,506 चे गुन्हे आणखी दाखल करण्यात आले आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत माझा गर्भपात झाला होता, असे तिने म्हटले होते. त्यामुळे त्या दृष्टीने देखील धारणी पोलिसांनी तपास करत गुन्ह्यात वाढ केली आहे.

दरम्यान, दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली असून या प्रकरणात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आणि अप्पर प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. तसंच आयोगाने लेखी खुलासा सुद्धा मागवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.