सातारा – माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाला अजून महिनाही उलटला नाही, तोच सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या असून त्या पक्षनेतृत्वाला चिंतेत टाकणाऱ्या आहेत. राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळालेल्या दीपक पवारांनी “शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव’ अशी हाक दिली असून सातारा व जावली तालुक्यातील बूथप्रमुखांसह दोन हजार कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या, दि. 29 रोजी सदरबझार येथे दीपक पवारांच्या संपर्क कार्यालयात होत आहे. त्यांच्या या खेळीमुळे भाजपच्या गोटात “ऑल इज नॉट वेल’ नसल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडत भाजपने सातारा-जावली मतदारसंघ शिवेंद्रसिंहराजे यांच्या रूपाने दिग्गज नेता गळाला लावला आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी “शिवेंद्रसिहराजे हटाव’चा सूर आळवल्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. खासदारांना नेहमीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या दीपक पवारांनी शिवेंद्रसिंहराजे यांना मात्र गेल्या पाच वर्षांत कायमच विरोध केला आहे.पेरायचे आम्ही, कसायचे आम्ही आणि पीक काढायला मात्र तिसराच, हे योग्य नाही, ही दीपक पवारांची भूमिका आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे.यापुढे पक्षात कोणी येणार असेल तर पक्षाचे नेते आम्हाला विचारतील, त्यावेळी योग्य उत्तर आम्ही देऊ, असे शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत दीपक पवार यांनी म्हटले होते. मात्र, त्यांना विश्वासात न घेताच ना. चंद्रकांत पाटील यांनी शिवेंद्रसिंहराजेंना भाजपमध्ये आणल्याने दीपक पवार नाराज झाले आहेत.
दीपक पवार म्हणाले, 35 वर्षांच्या खडतर आणि संघर्षमय राजकीय प्रवासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझे काम पाहून महामंडळाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत मला ताकद दिल्याने आम्ही सातारा-जावली मतदारसंघांत पक्षाची 432 बूथमध्ये बांधणी केली. पाच वर्षे मेहनत आम्ही करायची आणि सत्ता स्थापनेची वेळ आली की, दुसऱ्याला सहभागी करून घ्यायचे, हे आम्हाला मान्य नाही.
शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रवेश आपल्याला विश्वासात न घेताच झाल्याची तक्रार केवळ दीपक पवारांची नाही तर भाजपच्या वाढीसाठी गेली कित्येक वर्षे मेहनत घेणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या घरादाराचीही पर्वा न करणाऱ्या मूळ निष्ठावंतांची आहे. त्यामुळे पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी या मेळाव्यात होणार आहे. पक्षाच्या सातारा तालुका कार्यकारिणीचे प्रमुख सदस्य या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, भाजपच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची साथ दीपक पवारांना मिळणार का, हा प्रश्न आहे.
साताऱ्यात भाजपमध्ये “ऑल इज नॉट वेल’
मतभेद मिटवण्याचे महसूल मंत्र्यांसमोर आव्हान
दीपक पवार व शिवेंद्रराजे यांच्यातील मतभेदाची दरी मिटवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. शनिवारी शक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनासाठी चंद्रकांतदादा साताऱ्यात येणार असल्याचे समजते. शिवेंद्रराजे व दीपक पवार यांच्यातील वाद निवडणुकीच्या तोंडावर पेटला असून या भांडणाचा दूरगामी परिणाम होणार नाही, याची दक्षता चंद्रकांतदादांना घ्यावी लागणार आहे.