पुणे – शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे पुत्र आणि युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांच्या खूनप्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या स्वप्निल ऊर्फ चॉकलेट सतिश मोडवे (वय 30, रा. सुखसागर नगर, कोंढवा) यास विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी 29 ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शुक्रवारी (दि. 2) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास बुधवार पेठेतील गवळी आळी परिसरात दिपक मारटकर यांची धारदार हत्याराने वार करत गंभीर जखमी करून खून करण्यात आला होता. याप्रकरणात यापुर्वी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर, बापु ऊर्फ कुमार प्रभाकर नायर (रा. बी 39/3, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्याला यापुर्वीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये अटक करण्यात आली असून तो येरवडा कारागृहात आहे.
आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद करताना मोका विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर म्हणाले, मोडवे हा बापू नायर टोळीचा सक्रीय सदस्य असून सध्या टोळीची सर्व सुत्रे तो हाताळत आहे. प्रशांत ऊर्फ सनी कोलते, संदीप कोलते व लखन ढावरे हे 25 सप्टेंबर 2020 रोजी नायर यास ससून रुग्णालयात भेटण्यासाठी आले होते. यावेळी लखन याने त्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती. ती रक्कम कोणी दिली व त्यावेळी आणखी कोण हजर होते याचा तपास करायचा आहे. तपासादरम्यान, सनी याने एका व्यक्तीस शिवीगाळ करत तुला व मारटकरला गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी दिल्याने त्याबाबत तपास करायचा असून टोळीच्या आर्थिक उलाढालीच्या अनुषंगाने सखोल तपास करून पुरावा हस्तगत करायचा असल्याने त्याचा पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.