दीपक मानकर यांच्यासह दोघांना जामीन

मोक्‍कातून वगळण्याबाबत तुर्तास दिलासा नाही

पुणे – जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मागील अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह दोघांची उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्‍तता केली. परंतु, मोक्‍कातून वगळण्याबाबत त्यांना तुर्तास दिलासा मिळाला नाही.

या प्रकरणी मानकर आणि सुधीर यांनी याचिका दाखल केली होती. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी 2 जून 2018 साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर, विनोद रमेश भोळे (34, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय 30, रा. कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (28, रा. मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (36) आणि विशांत श्रीरंग कांबळे (30, रा. शांतिनगर, येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक झाली होती. तर, बिल्डर सुधीर कर्नाटकी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल आहे.

दरम्यानच्या काळात मानकर यांच्यावर आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मानकरांवर मोक्‍कानुसार कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर 14 ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्‍त आयुक्‍त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्‍त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच विशेष मोक्‍का न्यायालयाने दिले होते.

याविषयी मानकर यांचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, प्राथमिक दृष्ट्या मोक्‍का बसत नसल्याचे न्यायालयाने नमूद करताना म्हटले की, सेक्‍शन 23 प्रमाणे मोक्‍कासाठी जी परवानगी दिली गेली त्यामध्ये 8 गुन्हे होते. ते 8 गुन्हे या टोळीविरोधात पकडले तर, यामध्ये मोक्‍का लागत नसल्याचे नमूद केले होते. या प्रकरणात एकूण 14 गुन्हे होते. त्यातील 8 गुन्ह्यांवरती पोलिसांनी मोक्‍का लागू केल्यानंतर 14 पैकी 8 गुन्हेच का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. पोलिसांची चूक असेल तर, तुम्हाला का फायदा मिळाला पाहिजे अशीही विचारणा बचाव पक्षाला करण्यात आली होती. त्यावर मोक्‍काचे कलम 2 आणि 3 नुसार तीनपेक्षा जास्त शिक्षा असल्याचा गुन्हा लागतो. बाकीच्या गुन्ह्यात तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्याने त्यांच्यावर 14 पैकी आठच गुन्ह्यात मोक्‍का लावला असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरच्या युक्‍तीवादानंतर न्यायालयाने जामीन दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.