नवी दिल्ली – भारताची अव्वल जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरने आपण पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक असलेली पात्रता मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मूळ वेळापत्रकानुसार यंदा जुलैमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली असती तर तिला त्यात सहभागी होता आले नसते. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा एक वर्षे पुढे ढकलण्यात आली व त्यामुळे दीपाला आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळून त्यातून पात्रता मिळविण्याची आयतीच संधी देखील मिळाली आहे.
2018 सालच्या अखेरीस झालेल्या जागतिक स्पर्धेत दीपाला दुखापत झाली होती. यातून सावरण्यासाठी ती मेहनत घेत होती. त्याचवेळी ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याचे समजल्यानंतर हा मिळालेला वेळ तिच्या पथ्यावरच पडला आहे. गेल्या वर्षी देखील दीपाला दुखापतीमुळे अनेक स्पर्धांतून माघार घ्यावी लागली होती. यंदा ऑलिम्पिकपूर्व पात्रता स्पर्धेत देखील तिला सहभागी होता आले नव्हते त्यामुळे ती निऱाश झाली होती. मात्र, आता स्पर्धाच पुढे गेल्याने तिला अतिरीक्त वेळ मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांत झालेल्या एकूण 8 जागतिक स्पर्धांपैकी सहा स्पर्धांमध्ये मला दुखापतीमुळे सहभागी होता आले नाही. मात्र, अजूनही दोन स्पर्धा बाकी आहेत हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. या स्पर्धांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे पुढील एक वर्षात या स्पर्धा निश्चितच घेण्यात येतील. त्यामुळे मला दुखापतीतून बाहेर येऊन पूर्ण तंदुरुस्त होत या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. ही संधी मला सोडायची नाही, या स्पर्धांमध्ये अव्वल कामगिरी करुन आगामी ऑलिम्पिकची पात्रता मिळविण्याचा मला विश्वास आहे, असेही दीपाने सांगितले.