दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी पळवून लावले; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाला आंदोलक शेतकऱ्य़ांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. यावरून शेतकऱ्यांची बदनामी होत असताना या हिंसाचारामागे कोण होते, याची नावे आता पुढे येऊ लागली आहेत. यापैकीच एक दीप सिद्धू. शेतकरी नेत्यांनी दिप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप केला आहे. त्यावर दिप सिद्धू यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता दीप सिद्धू यांचा नवीन व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

हा व्हिडीओ आज सकाळचा असल्याचे सांगितले जात आहे. लाल किल्ल्यावरून गायब झालेला दीप सिद्धू आज सकाळी पुन्हा आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेला होता. यावेळी शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. तसेच आंदोलकांना चिथावणी देण्यास उकसविल्याचा आरोप केला. यामुळे दीप सिद्धू आणि त्याच्यासोबत आलेल्या काही जणांनी तेथून पलायन केले. दीप सिद्धूच्या मागून काही शेतकरीही धावले. अखेर दीप सिद्धू एका बाईकवरून पसार झाल्याचे या व्हिडीओमध्ये आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

लाल किल्ल्यावरील तिरंगा हटविल्याच्या दाव्यावर दीप सिद्धू याने स्पष्टीकरण दिले आहे. “आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानुसारच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकावला. आम्ही भारतीय झेंडा हटवला नाही”, असे दिप सिद्धू यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यानं फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दीप सिद्धू याचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अभिनेता सनी देओलसोबत व्हायरल झाल्याने त्याला शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळविण्यासाठी पाठविल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. यामुळे दीप सिद्धू कालपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.