‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री

चिंचवड येथील कोविड-१९ रुग्णालयाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ॲटो क्लस्टर, चिंचवड येथील कोविड-१९ रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयके आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरिता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुद्धच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवानिमित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी कोठेही गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळत, नियमित मास्क वापरुन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसेच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगले काम करीत आहे. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोना विरुद्धची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे कोविड-१९ रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यावेळेपासून आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे. तसेच त्यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सोई-सुविधांबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.