मात्र, ट्रम्प यांच्या दौऱ्याशी संबंध नसल्याचा दावा
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील एका ठिकाणच्या झोपड्या सात दिवसांत खाली करण्याचे फर्मान तेथील महानगर पालिकेने सोडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ती घडामोड घडली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याशी त्या आदेशाचा संबंध नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसे असले तरी त्या योगायोगामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ट्रम्प 24 फेब्रुवारीला गुजरात दौऱ्यासाठी दाखल होणार आहेत. ते अहमदाबादला भेट देणार आहेत. त्या भेटीवेळी त्यांना झोपड्या दिसू नयेत यासाठी रस्त्यालगत मोठी भिंत उभारली जात असल्याचे वृत्त आधीच मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. अशातच झोपड्या खाली करण्याच्या फर्मानाची माहिती पुढे आली आहे. त्या झोपड्या नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमलगत आहेत. त्या झोपड्यांमध्ये सुमारे 45 कुटूंबे राहतात. त्यांना झोपड्या खाली करण्यासंबंधीच्या नोटिसा पालिकेकडून बजावण्यात आल्या आहेत.
त्या नोटिसांच्या टायमिंगबाबत झोपडीधारकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आम्ही दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून संबंधित झोपड्यांमध्ये राहत आहोत. त्या खाली करण्याच्या नोटिसा याआधी कधीच आल्या नाहीत. आताच त्या का धाडण्यात आल्या, असा सवाल झोपडीधारकांकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे, नोटिसा बजावण्याचा संबंध ट्रम्प यांच्या दौऱ्याशी नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पालिकेच्या जागेवर झोपडीधारकांनी अतिक्रमण केल्याने नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात, मोटेरा स्टेडियमवर ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त कार्यक्रम होणार असल्याची बाब संबंधित घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षिण्याजोगी नसल्याचे अनेकांना वाटत आहे.