घर, रिटेल आणि छोट्या उद्योगासाठीचे कर्ज स्वस्त होणार
पुणे – स्टेट बॅंकेने आपल्या कर्जावरील एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित व्याजदरात तब्बल 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. कर्जावरील एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित व्याजदर म्हणजे ही ईबीआर अगोदर 8.05 टक्के होता तो आता 7.80% प्रति वर्ष झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून होणार आहे.
या दर कपातीमुळे आता बॅंकेकडून घरासाठी व उद्योगासाठी घेतलेल्या जुन्या आणि कर्जावरील व्याज दर कमी होणार आहेत. मात्र संबंधित ग्राहकाने आपल्या कर्जावरील व्याजदर एक्स्टर्नल बेंचमार्कशी जोडलेला असणे आवश्यक आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्याना आता किमान 7.9 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. या अगोदर हा दर 8.15 टक्के इतका होता. 1 जुलै 2019 पासून स्टेट बॅंकेने घरासाठी फ्लोटिंग व्याजदर योजना जाहीर केलेली आहे. स्टेट बॅंकेने छोटे उद्योग, घर आणि रिटेल कर्जासाठी फ्लोटींग रेटसंबंधातील कर्जासाठी एक्स्टर्नल बेंचमार्क म्हणून रिझर्व बॅंकेचा रेपो रेट गृहीत धरलेला आहे.
याअगोदर रिझर्व बॅंकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बॅंका व्याजदर कपातीस उशीर करीत होत्या. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना काही कर्जावरील व्याजदर एक्स्टर्नल बेंचमार्कशी जोडण्यास सांगितले होते. फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रिझर्व बॅंकेने रेपो दरात 1.35% यांची कपात केलेली आहे. मात्र बॅंकांनी आतापर्यंत आपल्या कर्जावरील व्याजदरात सर्वसाधारणपणे 0.44 टक्क्यांची कपात केली आहे. बॅंकांनी तीन महिन्यांतून एकदा एक्स्टर्नल बेंचमार्क दराशी जोडलेल्या व्याजदराचा आढावा घेणे अपेक्षित आहे. आता इतर बॅंकाही आपल्या एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित व्याजदरात कपात जाहीर करण्याची शक्यता आहे.