घटला टक्‍का, वाढली धाकधूक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही मतदारसंघात एकास एक झालेल्या तुल्यबळ लढतींच्या निकालाकडे शहवासियांचे लक्ष लागलेले असतानाच भोसरीत आणि चिंचवडमध्ये घटलेल्या मतदानाचा धोका कोणाला? याची चर्चा रंगली आहे. तर पिंपरीत वाढलेले चार टक्‍क्‍यांचे मतदान कोणाच्या पथ्थ्यावर पडणार यावर पैजा रंगू लागल्या आहेत.

पूर्वीच्या हवेली मतदारसंघात येणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात मतदारसंघ पुर्नरचनेत तीन नव्याने विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. सन 2009 आणि 2014 मध्ये सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले होते. 2009 साली तिरंगी, 2014 साली चौरंगी तर 2019 साली दुरंगी लढती रंगल्या. पिंपरी आणि भोसरी विधानसभेत आजी-माजी आमदारांमध्ये अत्यंत चुरशीची तर चिंचवडमध्ये प्रस्थापित विरूद्ध नवोदित अशी लढत रंगली.कोणत्याही परिस्थितीत विजय पदरात पाडण्यासाठी झालेल्या तुल्यबळ लढतींमुळे शहरातील मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा होती.

मात्र शहरात सर्वांत कमी मतदान झालेल्या पिंपरीला सोडून एकाही मतदार संघामध्ये गत विधानसभेच्या तुलनेत टक्‍केवारी वाढली नाही. भोसरीत एक टक्‍क्‍याने तर चिंचवडमध्ये तब्बल तीन टक्‍क्‍यांनी मतदान घटले. चिंचवडमध्ये सर्वाधिक आयटीचा वर्ग राहतो. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे या वर्गाने मतदानाऐवजी सुट्टी घेण्यात धन्यता मानल्यामुळे मतदानाची टक्केवारी घटल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर राजकीय विश्‍लेषकांच्या मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे चिन्ह नसल्यामुळे हे मतदान घटल्याचे अनुमान आहे. महायुती विरुद्ध सर्वपक्षीय अशी चिंचवडमध्ये लढत रंगली होती. घटलेले मतदान नेमके कोणाचे येत्या 24 तारखेलाच स्पष्ट होणार असल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

भोसरीत माजी आमदार विलास लांडे आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार यावर पैजा लागू लागल्या आहेत. पिंपरीतही आजी-माजी आमदारांमध्ये झालेल्या तुल्यबळ लढतीमध्ये यंदा 4 टक्‍क्‍यांनी मतदान वाढले आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्थ्यावर पडणार यावरच या मतदारसंघाचा निकाल लागण्याची शक्‍यता आहे. चिंचवडमध्ये शहरातील सर्वाधिक चुरशीची लढत होईल, असे मानले जात असतानाच मतदारांनी मात्र कमालीचा अनुत्साह दाखवला.

मतदानासाठी निवडणूक विभाग आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात केलेली जनजागृती, आपल्याला मत मिळावे यासाठी उमेदवारांनी केलेली प्रचाराची पराकाष्ठा आणि जणू काही मतदानासाठी थांबलेला पाऊस, या सर्व बाबीही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणू शकल्या नाहीत. सुमारे अर्ध्या मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का 2.48 टक्‍क्‍यांनी घसरलेला आहे. घसरलेला टक्का कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)