पुणे – रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात आपल्या मुख्य व्याजदरात म्हणजे रेपो दरात पुन्हा पाव टक्क्यांची कपात केल्यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आपल्या कर्जावरील व्याजदरात कपात करू लागल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार आता भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या जुन्या पद्धतीच्या कर्जावरील व्याजदरात म्हणजे मार्जिनल कॉस्ट बेसड् लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. या कमी केलेल्या व्याजदराची 10 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी होणार असूनही कपात सर्व प्रकारच्या कर्जांवर लागू करण्यात आली असल्याचे बॅंकेने जाहीर केले आहे.
रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केल्यानंतर इतर व्यवसायिक बॅंकांनी आपल्या व्याजदरात लगेच कपात करावी, अशा सूचना रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालयाने बॅंकांना दिले आहेत. स्टेट बॅंक ही भारतातील सर्वांत मोठी बॅंक असून या बॅंकेच्या निर्णयानंतर इतर बॅंकाही त्या पद्धतीने निर्णय घेतात. स्टेट बॅंकेने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 6 वेळा व्याजदरात कपात केली आहे.
मात्र, बुधवारी करण्यात आलेली व्याजदरातील कपात ही केवळ एमसीएलआर पद्धतीच्या व्याजदारावरील कपात आहे. रेपो आधारित कर्जावरील व्याजदरात आता तरी बदल करण्यात आलेला नाही. तो बदल लवकरच केला जाणार असल्याची शक्यता आहे.
स्टेट बॅंकेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली आहे त्याचबरोबर आगामी काळात उत्सव येत आहेत. या कारणांमुळे ग्राहकांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून एमसीएलआर आधारित व्याजदरात कपात करण्यात आली आहे. आता स्टेट बॅंकेचा एक वर्षासाठीचा एमसीएलआर दर 8.05 टक्के इतका झाला आहे.