नवी दिल्ली – जागतिक बाजारातून मंदीचे संकेत आल्यामुळे आणि भारतीय बाजारातही मागणी कमी असल्यामुळे सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घट नोंदली गेली आहे. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्ली सराफ शुद्ध सोन्याचे दर 150 रुपयांनी कमी होऊन 32,470 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले तर स्टॅंडर्ड सोन्याचे दर 150 रुपयांनी कमी होऊन 32,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
औद्योगिक क्षेत्राकडून काही प्रमाणात मागणी असल्यामुळे तयार चांदीचे दर मात्र 37,700 रुपये प्रति किलो ह्या पातळीवर स्थिर राहिले. जागतिक चलन बाजारात आणि शेअरबाजारात अस्थिर वातावरण असल्यामुळे आगामी काही दिवस तरी सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रुपयांचे मूल्य वाढत असल्यामुळे भारताला सोन्याची आयात स्वस्तात पडत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून भारतातून सोन्याची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.