देखाव्यांचे आकर्षण; सजावटीचे साहित्य खरेदीला गर्दी
सातारा – गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे तीन दिवस उरल्याने शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे मांडव उभारून झाले आहेत. मंडप उभारणीनंतर आता मंडळातील कार्यकर्त्यांची आकर्षक सजावट करण्याची लगबग सुरू झाली आहे. इतर मंडळांच्या तुलनेत आपल्या मंडळात बाप्पाच्या मूर्तीसाठी केलेली सजावट लोकांच्या पसंतीस उतरावी म्हणून सजावटीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुत्ती बाप्पांच्या सजावटीसाठीची लगबगही सुरू असून त्यासाठी बाजारात गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
बाप्पाचे आगमन जवळ आले असताना सार्वजनिक मंडळांच्या तयारीला वेग आला आहे. मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून सर्व भक्त बाप्पांच्या आगमानाची आतुरतेने वाट बघत आहेत. शहरातील काही मंडळांचे देखावेदेखील बऱ्यापैकी ठरले आहेत तर काही मंडळांच्या देखाव्यांची रंगरंगोटी सुरू आहे.
दरवर्षी जिवंत देखावे सादर करणाऱ्या शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमधील भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिवंत देखावे रद्द केले आहेत. काही मंडळांनी यंदा शे-दीडशे वादकांचा ताफा असलेल्या ढोल-ताशा पथकांवर होणाऱ्या खर्चालाही फाटा दिला आहे. या वाचलेल्या खर्चाची रक्कम काही मंडळांनी पूरग्रस्तांसाठी काही तरी ठोस करण्यासाठी वापरायची, असे ठरवले आहे.
शहरातील अनेक मंडळांनी आपली मंडप उभारणीची कामे पूर्ण केली आहेत. काही मंडळे आकर्षक विद्युत रोषणाई करणार आहेत तर तर काही मंडळांचे देखावे चलतचित्र असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. या देखाव्यांच्या कामांनाही सुरुवात झाली आहे.
सम्राट गणेश मंडळ, पंचमुखी, सातारा युवक कल्याण व क्रीडा, प्रतापसिंह मंडळ, मंडईचा राजा, व्यापारी मंडळ, पोवई नाका, बालगणेश मंडळ, आझाद मंडळ या मंडळांची सजावटीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. शहराच्या तुलनेत उपनगरांमध्ये पूर्णत्वाचा वेग कमी आहे. करंजे, गोडोली परिसरातील काही मंडळांनी सजावटीच्या कामांचा वेग वाढवला आहे.
कोडोली, शाहूनगर, सदरबझार, कोंडवे, सैदापूर, खेड, विकासनगर या उपनगरांमध्येही मंडप टाकून बाप्पांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, तेथे सजावटीची कामे अद्याप सुरू आहेत. काही मंडळांनी परंपरेप्रमाणे यंदाही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काही मंडळाचे देखावे मोठे असल्याने ते उशिराने सुरू करण्यात येतील, असे या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.