सजवीत असतो भुवन!!

तोच पाऊस रूप बदलून
नित्यनेमाने दरवर्षी येतो.
जो तो आपल्या परीने
स्वतःसाठी त्याचा बोध घेतो.
प्रेमिकांसाठी भिजून भेटण्याचा
तोच एक ऋतू स्पष्ट.
कुंद ढगांतून विहरत घेण्या
उभयतांचे हात हाती घट्ट.
डॉक्‍टरांसाठी पाऊस एक पर्वणी
तोच रूग्णांना लागतो धाडू.
डॉक्‍टर बिनधास्त त्याच्यावरतीच
आजाराचे तिकीट लागतो फाडू.
विद्यार्थ्यांचा पाऊस एक मित्र
त्यातून त्यांना मिळे आनंद.
शाळेला सुट्टी मारत मारत
पावसात करीती विहार स्वछंद.
वकिलांचा तो असतोच सखा
अशीलाचा पावसात फोन येतो.
वकीलाचे काम तिथेच होते
तो फक्त पुढील तारीख घेतो.
नेते, अधिकाऱ्यास पाऊस असतो
केवळ चरण्याचे एक कुरण.
पूरग्रस्त वा दुष्काळ निधी
असो कोणतेही एक कारण.
रिक्षा टॅक्‍सीवाल्यांना देखील
पाऊस म्हणजे तेजीचा धंदा.
भिजत बसची वाट बघण्या
प्रवाशासही येतो की वांदा.
सार्वजनिक बांधकाम ठेकेदारांस
पाऊस म्हणजे लाभाचा गुरु.
खड्डे शोधा खड्डे बुजवा
हेच मलईचे काम सुरु.
पावसाचे मोल बळीराजाच जाणे
त्यावर त्याचे व आपलेही जीवन.
पावसाच्या साथीने कृषकही मग
सर्वांसाठी सजवीत असतो भुवन!
सर्वांसाठी सजवीत असतो भुवन!!

– उत्तम पिंगळे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×