निळे अंबर सजे

मेघांच्या पालखीतून
पर्जन्यदेव निघे
तारकांची रोषणाई
निळे अंबर सजे

सळसळती विद्युल्लता
पुढे नृत्य करे
जलदांचे पथक पुढे
ढोल ताशे गर्जे

उल्हसित मेघकुळ
वरात घेऊन निघे
पर्जन्यदेव धरादेवी
विवाहोत्सव साजे
इंद्रधनुची कमान
नभोमंडपी झळके
मयुरांचे पदन्यास
स्वागतासी थिरके

चातकांचे थवे
उडाले स्वागतासी पुढे
रज:कणांचे आवर्त
आकाशात फिरे

अंधाराचा अंतरपाट
मुहूर्तावर फिटे
पर्जन्यदेव धरादेवी
विवाह असा घडे….

– डॉ. उमा बोडस

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.