विक्रमी पातळीवरून निर्देशांकात घसरण

मुंबई – मंगळवारी शेअर बाजार निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर बंद झाले होते. त्यामुळे गुंतवणूकदार सावध असतानाच जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आल्यामुळे बुधवारी शेअर बाजारात बरीच विक्री होऊन निर्देशांक घसरले.

सध्या निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. एकूण परिस्थिती पाहता या निर्देशांकात आणखी वाढ होण्याची शक्‍यता कमी आहे, असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे नफा काढून घेण्याचे प्रमाण चालू आहे.

बाजार बंद होताना विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 101 अंकांनी म्हणजे 0.64 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 15,767 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 271 अंकांनी कोसळून 52,501 अंकांवर बंद झाला.

रिलायन्स, एचडीएफसी बॅंक, पावर ग्रिड, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. सकाळी निर्देशांक बरेच घसरले होते. मात्र नंतर काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांकांची मोठी हानी टळली.

आजच्या विक्रीच्या वातावरणातही नेस्ले, एनटीपीसी, ओएनजीसी, बजाज फिन्सर्व, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात सुधारणा झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या पतधोरण समितीची बैठक सध्या चालू आहे. लवकरच फेडरल रिझर्वचे पतधोरण जाहीर होणार आहे.

अमेरिकेमध्ये महागाई वाढण्याची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व व्याजदर वाढीबाबत काही संकेत देते का याकडे भारतीय गुंतवणूकदाराबरोबरच जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.

जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारण्याची लक्षणे असल्यामुळे क्रुड तेलाचे भाव वाढत आहेत. सध्या क्रूडचे दर 74 डॉलर प्रति पिंपापर्यंत गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुपयाच्या मूल्यात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.

आजही रुपयाचा भाव कमी झाला त्यामुळे निर्देशांकाने फारसा आधार मिळाला नाही. परदेशी संस्था गुंतवणूकदारांकडून मात्र खरेदी चालू असल्याचे वातावरण आहे. काल या गुंतवणूकदारांनी 663 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची माहिती शेअर बाजारात दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.