मुंबई – शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर असतांनाच रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचे पतधोरण जाहीर केले. दरम्यानच्या काळामध्य सर्वोच्च न्यायालयाने फ्युचर रिटेलसंदर्भातील निर्णय रिलायन्स कंपनीच्या विरोधात दिला आहे. या कारणामुळे जोरदार विक्री होऊन शुक्रवारी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 215 अंकांनी कमी होऊन 54,277 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56 अंकांनी कमी होऊन 16,238 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बॅंक, टाटा स्टील, एचडीएफसी, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मात्र एअरटेल, इंडसइंड बॅंक, महिंद्रा, मारुती, एनटीपीसी, बजाज ऑटो या कंपन्यांनी आगेकूच चालू ठेवली. व्होडाफोन कंपनीचा शेअर आज 19 टक्क्यापर्यंत वाढला तर फ्युचर समुहाचे शेअर 10 टक्क्यापर्यंत कमी झाले.
या घटनाक्रमाबाबत रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार आणखी खरेदी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे काही गुंतवणूक काढून घेत असल्याचे वातावरण आहे. फ्युचर समूहाची रिलायन्स इंडस्ट्रीजने खरेदी केली होती.
मात्र या खरेदीला अमेझॉन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने ऍमेझॉन कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनीच्या शेअरच्या भावात दोन टक्के घट झाली. त्याचा मुख्य निर्देशांकावर परिणाम झाला. जागतीक बाजारातूनही फारसे सकारात्मक संदेश आले नाहीत.