शेअर बाजार निर्देशांकांत घट; अखेरच्या सत्रात जोरदार विक्री

मुंबई – सकाळी शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. मात्र सायंकाळी बड्या कंपन्यांच्या शेअरची बरीच विक्री झाल्यामुळे शेअर निर्देशांकात घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 323 अंकांनी कमी होऊन 58,340 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 88 अंकानी म्हणजे 0.5 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 17,415 अंकांवर बंद झाला. मारुती, इन्फोसीस, टेक महिंद्रा, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात 2.65 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाल्यामुळे निर्देशाकांना आधार मिळाला नाही.

मात्र अशा परिस्थितीतही कोटक बॅंक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स, पावर ग्रिड या कंपन्याच्या भावात थोडीफार वाढ झाली.

शेअर बाजारातील विक्रीचा जोर एवढा होता की सेन्सेक्‍स संदर्भातील 30 पैकी 22 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. माहिती तंत्रज्ञान, वाहन, भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू या क्षेत्रांनी आज सपाटून मार खाल्ला. तर बॅंकिंग, वित्तीय संस्था आणि तेल व नैसर्गिक वायू ह्या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर तेजीत होते.

पेटीएमची अगोकूच

पेटीएम, कंपनीच्या आयपीओनंतर या कंपनीचा शेअर कोसळला होता. मात्र कालपासून या शेअरची किंमत वाढू लागली आहे. आजही या कंपनीचा शेअर 17 टक्‍क्‍यानी वाढला. त्यामुळे आता या कंपनीचे बाजारमुल्य 1 लाख कोटी रुपयाच्या पुढे गेले आहे.

तेजी -मंदीचा अंदाज

महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण असल्यामुळे भारतीय शेअर बाजारातही विक्रीचे वारले आहेत. ही परिस्थिती लघु पल्ल्यात कायम राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली आहे. कालही या गुंतवणूकदारांनी 4,477 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जर्मनीत पूर्ण लॉकडाउन करण्याच्या निर्णयाचा शेअर बाजारावर आज परिणाम झाला. गुरुवारी फ्युचर अँड ऑप्शनची मुदत संपत असल्यामुळे बाजारात वातावरण नकारात्मक राहील. निफ्टीला 17,216 अंकावर तांत्रिकदष्टया आधार आहे.

असे असले तरी विशिष्ट घटनाक्रमावर आधारित काही कंपन्या तेजीत राहण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारने दोन बॅंकांचे खासगीकरण करण्याचे विधेयक मांडायचे ठरवले आहे. त्यामुळे आज सरकारी बॅंकांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. आगामी काळातही सरकारी बॅंकांच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचा ओढा कायम राहण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.