जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे आदेश…
पुणे(प्रतिनिधी) – ग्रामीण भागात करोना रुग्ण आढळणाऱ्या परिसरात तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले. दरम्यान, कार्यक्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना 1 किंवा 2 रुग्ण आढळून आल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करण्यात येऊ नयेत. सोसायटीमध्ये रुग्ण आढळला असल्यास, सोसायटीमधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात यावा, परंतु सोसायटीजवळील स्वतंत्र उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करू नयेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांच्यामार्फत करोनाबाधित भागात प्रतिबंधित क्षेत्र किंवा सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना परिसरात 1 किंवा 2 रुग्ण आढळले असताना संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात घेत आहे. त्यामुळे त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापनादेखील बंद करण्यात येत आहेत, असे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून हे आदेश देण्यात आले आहेत.
उद्योग व औद्योगिक आस्थापनेमध्ये 1 किंवा 2 रुग्ण आढळल्यास, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे कॉन्टॅक ट्रेसिंग करून आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व औद्योगिक आस्थापना बंद करण्यात येऊ नये. तसेच रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने बंद करणे आवश्यक असल्यास यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.