देशासाठी आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा; स्वत:साठी परदेशी विमाने

येचुरी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली -एकीकडे देशासाठी आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा दिल्या जातात. तर दुसरीकडे स्वत:साठी परदेशी विमाने खरेदी केली जातात, अशा शब्दांत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर निशाणा साधला.

बोईंग या अमेरिकी कंपनीकडून भारत दोन आलिशान विमाने घेणार आहे. त्या विमानांचा वापर पंतप्रधान आणि इतर भारतीय उच्चपदस्थांसाठी केला जाणार आहे. त्याचा संदर्भ देऊन येचुरी यांनी ट्‌विटरवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. स्थलांतरित मजूर, शेतकऱ्यांना करोना संकटाच्या काळात कुठलाच दिलासा दिला गेला नाही.

मात्र, करदात्यांकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रूपयांचा चांगला वापर करण्याचा मार्ग सरकारला सापडला आहे. व्यक्तिगत प्रवासासाठी परदेशी विमानांचा आधार घेतला जाणार आहे, असे त्यांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरूनही येचुरी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर घसरले तेव्हा सरकारने त्याचा लाभ जनतेला मिळू दिला नाही.

सरकारने इंधनांवरील उत्पादन शुल्क वाढवले. आता जगण्यासाठी धडपडणाऱ्या जनतेवर आणखी आर्थिक बोजा टाकला जात आहे. जनतेच्या हालअपेष्टांमधूनही फायदा उठवण्याची बाब लज्जास्पद आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.