प्राध्यापक वेतननिश्‍चिती वेळापत्रक जाहीर

पुणे – विद्यापीठे आणि विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेतील वेतननिश्‍चितीबाबत उच्च शिक्षण विभागाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शिक्षकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्‍चितीचे काम पूर्ण करावे, असे आदेश उच्च शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

प्राध्यापकांच्या सुधारित वेतननिश्‍चितीबाबत सावित्रीबाई फुले विद्यापीठात नुकतीच कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात झालेल्या चर्चेनुसार सर्व विभागीय सहसंचालकांना वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयांनी तथा प्राचार्यांनी प्राध्यापकांचे वेतननिश्‍चिती करून दि. 30 एप्रिलपर्यंत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्‍यक आहे. विद्यापीठस्तरावर महाविद्यालयांकडून प्राप्त प्रस्तावांची तपासणी अथवा पडताळणी करण्यासाठी 20 ते 30 एप्रिल अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठाकडून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विभागीय सहसंचालक स्तरावर 25 एप्रिल ते 30 मे या कालावधीत पडताळणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर दि.1 ते 30 मे या दरम्यान वरिष्ठ लेखी परीक्षकांकडून वेतननिश्‍चिती पडताळणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष वेतनाचा लाभ एचटीई सेवार्थमधून “मे पेड इन जून’मध्ये होणार असल्याचे उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.