पुणे – सर्वसामान्य नागरिकांना सुपरमॅन बनवायचे आहे. महायुती सत्तेवर आल्यापासून पहिल्या कॅबिनेटपासून शेवटच्या कॅबिनेटपर्यंत जनहिताचेच निर्णय घेतले, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेवर होते. त्यांनी जनतेच्या हितासाठी काय केले, हे सांगावे, आम्हीही काय केले ते सांगायला खुलेपणे तयार आहोत, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
शिवाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह शहरातील आठ उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री आणि कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील, कसब्याचे उमेदवार हेमंत रासने, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की सत्तेवर आल्यापासून विकासकामाचा धडाकाच सरकारने लावला. अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने केवळ चार सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली, तर आम्ही आमच्या कालावधीत तब्बल १२४ प्रकल्पांना मंजुरी देऊन लाखो एकर जमीन ओलिताखाली आणली. शेतकरी अन्नदाता आहे. संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. ४५ हजार कोटी निधी विविध कारणांसाठी दिला. शेतकरी सन्मान योजनेचा निधीही वाढविला आहे. ज्येष्ठांची पेन्शन योजना १५०० वरून २१०० केली.
१० लाख युवकांना प्रशिक्षण भत्ता लागू केला. २५ लाख रोजगार निर्मिती प्रस्तावित आहे. लाडकी बहीण योजनेविषयी ते म्हणाले, सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्या वेळी विरोधकांनी सुरुवातीला या योजनेला नावे ठेवली. मात्र, ही योजना लोकप्रिय ठरली. त्यामुळे विरोधकांनी ही योजना चोरली. त्यांच्या वचननाम्यात या योजनेचा समावेश केल्याचे त्यांनी सांगितले.
देशात सर्वाधिक विकास प्रकल्प राज्यात येत आहेत. महायुतीच्या काळात विकासाबाबत राज्याने देशात पहिला क्रमांक पुन्हा मिळविला आहे. विरोधकांच्या थापांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, की शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. यापुढेही मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.