महाविकास आघाडी की स्वबळ?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हा निर्णय स्थानिक खासदार, आमदार घेतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पवार हे पिंपरी चिंचवड शहराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. शनिवारी त्यांनी शहरातील विविध विकास कामांची उद्घाटने केली. भोसरी येथील रुग्णालयातील आयसीयू विभागाचेही उद्घाटन केले. आमदार आण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, “महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार का याचा निर्णय मी एकटा घेणार नाही. त्या जिल्ह्यांमधील नेते, कार्यकारिणी याबाबतचे निर्णय घेईल. किंवा त्यामध्ये तीनही पक्षांचे नेते एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतील. त्यांचे ठरल्यानंतर अंतिम ते मला विचारतील त्यावेळी मी काय निर्णय द्यायचा तो देईल.’
पिंपरी-चिंचवडचा सेनापती कोण?
पिंपरी-चिंचवड मनपात भाजपची एकहाती सत्ता आहे. आगामी निवडणुकीमध्ये शहराचे नेतृत्व कोणाकडे असणार याबाबत विचारले असता पवार म्हणाले, “पक्षाला प्रवक्ता नाही अशी टीका करण्याचे काम विरोधी पक्षांचे आहे. पक्षांचे धोरण ठरविण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे करतील. त्यामध्ये तिसरा माणूस कोणीही काम करणार नाही. आगामी निवडणुकीचे सूत्र कोणाच्या हाती द्यायचे याबाबात स्थानिक नेते, खासदार आमदार यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.’