भारताची पैलवान विनेश फोगाट हिनं पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरी गाठली होती. मात्र या सामन्यापूर्वीच तिला अपात्र घोषित करण्यात आले. विनेश फोगाटला पदक मिळाल्यानंतर जल्लोषाची तयारी करणाऱ्या देशवासियांना देखील या बातमीमुळे मोठा धक्का बसला. अंतिम फेरीतपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं होतं. यामुळं तिला निलंबित करण्यात आलं होतं.
विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणात CAS कडून पुन्हा एकदा निर्णय लांबणीवर टाकला आहे. या याचिकेवर आज निर्णय येणे अपेक्षित होते मात्र हा निर्णय आता 16 ऑगस्टला येणार आहे.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश करताना जपानच्या सुवर्णपदक विजेत्या यूई सुसाकीचा पराभव केला होता. उपांत्यपूर्व फेरीत यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा देखील विनेशनं पराभव केला होता. तर, उपांत्य फेरीत क्यूबाच्या वाय. गुझमान लोपेझ हिचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीचा सामना खेळण्याआधीच तिला अपात्र घोषित करण्यात आले.