पुणे -शहरातील पेठांचा बहुतांश भाग करोना प्रतिबंधित क्षेत्रात येतो. त्यामुळे भवानीपेठ, रास्ता पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गणेश पेठ तसेच नाना पेठेतील दुकाने उघडण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. पण, शहरातील इतर भागांत व्यवसाय सुरू होत असताना, या भागांतही दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळिया, अतुल अष्टेकर, विपूल अष्टेकर यावेळी उपस्थिती होते. यावेळी व्यापारी महासंघाची भूमिका ऐकल्यानंतर पवार यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, विशेष अधिकारी सौरभ राव यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी प्रतिबंधित क्षेत्रांत पोलिसांनी दुकाने उघडण्यास अजून परवानगी दिली नसल्याचे राव यांनी सांगितले. यावेळी महापालिका आणि पोलीस आयुक्तांची सोमवारी संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आदेश पवार यांनी दिले.