वैद्यकीय परीक्षांविषयी 72 तासांत निर्णय

पुणे – कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही. मात्र, विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग या सर्वांशी चर्चा करून परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील 72 तासांत निर्णय घेऊ, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी स्पष्ट केले.

एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवीच्या परीक्षा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात अमित देशमुख यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, सिनेट सदस्य आदींशी संवाद साधला.

त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. ते अधिक कडक करण्याची शक्‍यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास अडचणी उद्‌भवणार असतील तर त्या अडचणींचा सकारात्मकपणे विचार करू. यापूर्वीच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून यानंतर पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून योग्य ती भूमिका घेणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. नॅशनल मेडिकल कौन्सिलने अंतिम वर्ष वैद्यकीय शाखेच्या परीक्षा वेळेवरच घेण्याच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.