“एक गाव एक गणपती’चा माणमधील 32 गावांमध्ये निर्णय

दहिवडी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

गोंदवले (प्रतिनिधी) – दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केलेल्या आवाहनाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 32 गावांनी प्रतिसाद दिला आहे. या गावांमधील ग्रामस्थांनी “एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचा निर्णय एकमताने घेतल्याने पोलीस दलाचा सन्मान वाढण्यास मदत झाली आहे.

करोनाच्या संकटाशी मुकाबला करताना गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, “एक गाव एक गणपती’ उपक्रम गावोगावी राबवला जावा यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्नांना माण तालुक्‍यात चांगले यश मिळत आहे. सपोनि भुजबळ यांनी दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील सार्वजनिक मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन “एक गाव एक गणपती’बाबत आवाहन केले. या आवाहनला अनेक गावांनी सकारात्मक प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे संकट असले तरी बुद्धीची देवता असलेल्या विघ्नहर्त्याच्या उत्सवाचा भक्तांमधील उत्साह कायम आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आपापल्या हद्दीतील जास्तीत जास्त गावांमध्ये एकच सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना होण्यासाठी करत आहेत. त्यात माण तालुक्‍यात दहिवडी पोलीस ठाण्याने बाजी मारली आहे. “एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविणाऱ्या गावांची संख्या येत्या दोन दिवसांत वाढेल, अशी आशा भुजबळ व कर्मचाऱ्यांना आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत 65 गावे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.