राज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापतींचा एकदिवसीय उपोषणाचा निर्णय

नवी दिल्ली –  कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर  राज्यसभेचे उपसाभपती हरिवंश नारायण सिंह यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहले आहे.

हरिवंश नारायण सिंह म्हणाले कि, २० सप्टेंबर २०२० रोजी राज्यसभेत जे काही झाले, त्यामुळे मागील दोन दिवसांपासून मी अतिशय मानसिक तणावात आहे. मी रात्रभर झोपू देखील शकलो नाही. उच्च सभागृहात जे काही घडले, त्यामुळे सभागृहाच्या मर्यादेचे मोठे नुकसान झाले आहे. सभागृहात सदस्यांकडून लोकशाहीच्या नावाखाली हिंसक कृत्य झाले. या ठिकाणी बसलेल्या सदस्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न झाला. उच्च सभागृहाची मर्यादा आणि व्यवस्थेचे उल्लंघन करण्यात आले, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच या घडामोडींमुळे  हरिवंश यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने शेतीविषयक प्रस्तांवावर राज्यसभेत प्रत्यक्ष मतदान न घेताच ही विधेयके रेटून संमत केल्याने राज्यसभेत विरोधी सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ केला होता. याप्रकरणी सोमवारी विरोधी पक्षांच्या आठ खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले होते. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी आंदोलन करणाऱ्या आठ निलंबित खासदारांची सकाळीच भेट घेतली. उपसभापतींनी आंदोलक खासदारांसाठी चहा देखील आणला. राज्यसभेत वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्याने आणि उपसभपतींसोबत गैरवतन केल्याने राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. याविरोधात सर्व खासदारांनी गांधीजींच्या मूर्तीजवळ ठिय्या मांडून आंदोलन केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.