लोणंद (प्रतिनिधी) – लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील यांच्या विरोधात 17 नगरसेवकांपैकी विविध पक्षांच्या 13 नगरसेवकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर उद्या, दि. 22 रोजी दुपारी 12 वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात चर्चा होणार आहे. सचिन शेळके यांचे पद राहणार की जाणार, याबाबत लोणंदकरांनाच नव्हे तर संपूर्ण खंडाळा तालुक्यातील जनतेला उत्सुकता आहे.
वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विश सभा होणार आहे. नगराध्यक्ष सचिन शेळके हे आपल्या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी नंतर राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून दहा महिन्यांसाठी नगराध्यक्षपद मिळवले. हा कार्यकाळ संपल्यावर राजीनामा देण्याऐवजी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपच्या गोटात प्रवेश करून पद वाचवण्यात यश मिळवले होते. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या इतर नगरसेवकांची चांगलीच गोची झाली होती. आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या मिळून 13 सदस्यांनी नगराध्यक्षांविरोधात एकत्र येऊन मोट बांधली आहे; पण ही एकजूट उद्या दुपारपर्यंत टिकणार का, हा औत्सुक्याचा विषय आहे.
नगराध्यक्ष सचिन शेळके नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. दरमहा सर्वसाधारण सभा बोलावणे कायद्याने बंधनकारक असताना जाणीवपूर्वक ही सभा बोलावत नाहीत. त्यामुळे नगरपंचायतीचे कामकाज वेळच्या वेळी होत नाही, अशी कारणे देत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर हणमंतराव शेळके-पाटील, विकास केदारी, शैलजा खरात, हेमलता कर्नवर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, किरण पवार, स्वाती भंडलकर, ऍड. पुरुषोत्तम हिंगमिरे, लक्ष्मणराव शेळके-पाटील, लीलाबाई जाधव, योगेश क्षीरसागर, दीपाली क्षीरसागर या नगरसेवकांच्या सह्या आहेत.
ठराव बारगळण्याची शक्यता?
सचिन शेळके यांचे पद जाणार की राहणार, याची लोणंदच्या चौकाचौकात आठवडाभरापासून चर्चा आहे. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 13 मते आवश्यक आहेत. ठरावावर सह्या केलेले 12 नगरसेवक आधीच अज्ञातस्थळी गेले आहेत; पण एक नगरसेवक लोणंदमध्येच असल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने हा ठराव बारगळण्याचीच शक्यता अधिक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. एका सदस्याने आपल्या मतासाठी “अर्थ’पूर्ण तडजोडीची खुली ऑफर दिल्याची कुजबूज असल्याने या ठरावाचे काय होणार, हे दुपारनंतरच स्पष्ट होईल.