फैसला ऑन दी स्पॉट योग्य की अयोग्य?

हैदराबाद बलात्कार प्रकरण : विविध स्तरातून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

पिंपरी – हैदराबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्‍टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार केले. संपूर्ण दिवस पोलिसांनी आरोपींना यमसदनी धाडल्याच्या घटनेबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत होत्या. मोठ्या प्रमाणावर पोलीस कारवाईचे समर्थन केले जात होते तर काहींनी हे कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत चुकीचा पायंडा पाडला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली. याबाबत दैनिक “प्रभात’ने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरिकांची मते जाणून घेतली.

मत जनतेचे…

महिलांनी किती दिवस असा अन्याय, अत्याचार सहन करायचा. पोलिसांनी जे केले आहे ते स्वागतार्हच आहे. यापूर्वीच करायला पाहिजे होते. अशाप्रकारे जागेवर गोळ्या घातल्या असत्या तर अनेक गुन्हे झालेच नसते. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्‍यक आहे. पोलिसांचे आभार.
– माई ढोरे, महापौर, पिंपरी-चिंचवड मनपा


पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रकरणाचा निकाल लावला आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल. घटनास्थळी तपास करत असताना आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना मारण्यात आले आहे. देशातील सर्व जनता या निर्णयाचे स्वागत करत आहेत. आतापर्यंत अत्याचाराच्या जेवढ्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अशा पद्धतीनेच निकाल लावण्याची गरज आहे. तरच या सर्व गुन्ह्यांना आळा बसेल.
– नाना काटे, विरोधी पक्षनेता पिं.चिं. महापालिका.


पोलिसांनी जर त्यांना मारले नसते तर त्यांनी पोलिसांना मारले असते. माझे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा जीव माझ्यासाठी बलात्काऱ्यांच्या जीवापेक्षा कित्येक पटीने अधिक किंमती आहे. “यामुळे सर्व गुन्हेगारांवर वचक बसेल.
– डॉ. प्रियंका बन्सल, दंत चिकित्सक


महिला डॉक्‍टरवर झालेला बलात्कार महिला डॉक्‍टरवर झालेली बलात्काराची घटना निंदनीय आहे. अशा संवेदनशील घटनांमध्ये न्यायदानाची प्रक्रिया लवकर व्हायला हवी. आरोपींचा पोलिसांकडून झालेला “एन्काऊंटर’ कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत आपल्याला कल्पना नाही. मात्र, या घटनेत आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. “एन्काऊंटर’ हा त्याच्यावर पर्याय नाही.
– ऍड. अनिलकुमार तेजवानी


पळून जाणाऱ्या आरोपींचे पोलिसांनी “एन्काऊंटर’ केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांनी यातून एकप्रकारे धडाच दिला आहे. चुकीच्या प्रवृत्तीतून बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. महिलांनी न घाबरता स्वत:ची काळजी स्वत:च घ्यायला हवी. महिलांच्या संरक्षणासाठी कायदा होणे गरजेचे आहे.
– डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेविका


डॉक्‍टर युवतीवर झालेला अत्याचार व हत्या हा घृणास्पद प्रकार होता. माणुसकी नष्ट होऊन पाशवीपणा वाढला आहे. ही विकृती वेळीच ठेचणे आवश्‍यक आहे. अशा मनोविकृत लोकांचा खात्मा करून पोलिसांनी समाजातील एक प्रकारची घाण दूर केली आहे. पोलिसांचे आभार.
– डॉ. अभय तांबिले, सचिव निमा संस्था.


बलात्कार हा प्रकार निंदनीयच आहे. अशा चुकीच्या प्रवृत्तींविषयी सामाजिक प्रबोधन आणि विवेक दृष्टी विकसित करणे गरजेचे आहे. मुलांना शालेय वयापासून लैंगिक शिक्षण द्यायला हवे. पोलिसांनी केलेला “एन्काऊंटर’ हा प्रथमदर्शनी संशयास्पद वाटतो. त्याबाबत त्रयस्थ समितीमार्फत चौकशी व्हायला हवी.
– डॉ. राजेंद्र कांकरिया, सह-समन्वयक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती


बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने आवश्‍यक तरतूद करायला हवी. हैदराबाद बलात्कार घटनेतील आरोपी पळून चालले होते तर ते दोषी होते. जर, ते दोषी नसते तर पळून गेले नसते. आरोपी पळून चालल्याने पोलिसांना “एन्काऊंटर’ करावा लागला. या घटनेत आरोप सिद्ध व्हायला हवा होता.
– राजन लाखे, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड


ज्या दुष्टतेने आरोपींनी गुन्हा केला आहे, ते पाहता पोलिसांची कारवाई योग्यच आहे. परंतु न्याय व्यवस्था जलद झाल्यास असे गुन्हे होणार नाहीत आणि पोलिसांवर दबावही वाढणार नाही. स्त्रीचा आदर करण्याची शिकवण प्रत्येक घरातून देण्यात आल्यास अशी परिस्थितीच उद्‌भवणार नाही. हा घटनाक्रम समाज आणि व्यवस्थेसाठी एक चपराक आहे, याची पुनरावृत्ती होऊ न देणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
– पै. सचिन पवार, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिकक


महिला डॉक्‍टरवरील बलात्कार प्रकरणातील आरोपींचा “एन्काऊंटर’ झाल्याचे समजल्यावर आनंद झाला. चांगले झाले, देव पावला. अशा प्रकरणांमध्ये सात दिवसांच्या आत न्यायालयाकडून निकाल लागणे आवश्‍यक आहे. पुरावे असतानाही या प्रकरणांमध्ये आरोपींवर तत्काळ कार्यवाही का होत नाही? बलात्कारासाख्या घटनांमुळे महिलांना असुरक्षित वाटते. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी अशा घटनांतील आरोपींचा लवकर छडा लावून त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे.
– प्रियंका यादव, अभिनेत्री


बलात्कार व हत्येची घटना निंदनीयच आहे. मात्र, आरोपी दोषी आहेत की नाही हे तपासणे गरजेचे होते. आरोपींना कायद्यानुसार शासन व्हायला हवे होते. “एन्काऊंटर’ हा कायद्याला धरून नाही. अशा प्रकारे कोणाचाही “एन्काऊंटर’ होऊ शकतो. याची चौकशी व्हायला हवी.
– डॉ. सुरेश बेरी, सामाजिक कार्यकर्ते


प्रथमदृष्ट्या हैद्राबाद पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच वाटते आहे. परंतु याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर न्यायप्रक्रिया वेगवान झाली पाहिजे. किमान बलात्काराच्या बाबतीत काही दिवसांमध्येच निकाल लागून शिक्षाही झाली पाहिजे. आज काही नेते मंडळी वेगवेगळी वक्‍तव्ये देत आहेत. त्यांनी मते व्यक्‍त करण्यासोबत यात ठोस पाऊले उचलली पाहिजेत. अन्यथा स्त्री अत्याचार थांबणार नाहीत. परंतु पोलिसांनी जे काही केले ते आज तरी योग्यच वाटत आहे. – जितेंद्र कुलकर्णी, उद्योजक
चार आरोपींचा पोलिसांनी “एन्काऊंटर’ केला. त्यामुळे त्या तरुणीच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असेल. पोलिसांनी उचलेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. सरकारने बलात्कार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीने शिक्षा करायला पाहिजे. अशा घटनांमुळे मुलींनी घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्‍न पडला आहे.
– पार्वती बाकळे, क्रीडा शिक्षिका, डी.वाय.पाटील पब्लिक स्कूल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)