पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर या परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक त्वरीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
वर्षातून दोन वेळा “टीईटी’ घेण्याबाबतची घोषणा शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र वर्षातून एकदाही परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून मुदतीत परवानगी दिली जात नाही. यामुळे परीक्षा लांबणीवर पडण्याच्या प्रकारात वाढ होत चालली आहे. 15 जुलै 2018 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत परीक्षा घेण्यात आली नाही.
परीक्षा कधी होणार, याबाबतची विचारणा उमेदवारांनी अनेकदा परीक्षा परिषदेकडे केली होती. दरम्यान, परीक्षा परिषदेने दि.25 जुलै रोजी शासनाला पत्र पाठवून परीक्षेबाबत परवानगी मागितली होती. डिसेंबर किंवा जानेवारीत परीक्षा घेण्यास मान्यता मिळावी, असे या पत्रात म्हटले होते. त्याची दखल घेत अवर सचिव स्वप्निल कापडणीस यांचे परीक्षा घेण्याबाबतच्या मान्यतेचे पत्र 26 सप्टेंबरला परीक्षा परिषदेला मिळाले आहे.
या महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून याची आचारसंहिता लागू आहे. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये इतर विविध परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन परीक्षा परिषदेने पूर्वीच जाहीर केलेले आहे. फेब्रुवारीमध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.”टीईटी’च्या परीक्षेच्या नियोजनासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे आता जानेवारीमध्ये परीक्षा घेण्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे.
आचारसंहितेच्या कालावधीत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करायचे की नाही याबाबतची विचारणाही राज्य परीक्षा परिषदेकडून शासनाकडे करण्यात आली होती.